पुणे : पुणेकरांसाठी शनिवारचा दिवस दिलासादायक ठरला. ३० मार्चनंतरची सर्वाधिक घट शनिवारी नोंदविली गेली. सक्रिय रुग्णांची संख्या सलग सहाव्या दिवशी कमी झाली असून बरे होणाऱ्यांची संख्याही पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक आहे. दिवसभरात ३ हजार ९९१ रुग्ण नोंदविले गेले. ३० मार्चनंतर पहिल्यांदाच हा आकडा चार हजारांच्या खाली गेला आहे. दिवसभरात ४ हजार ७८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ४७२ वर आली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ६ हजार ५८१ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ५५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४३ झाली आहे. पुण्याबाहेरील १९ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिवसभरात एकूण ३ हजार ९९१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ लाख ३९ हजार ५७१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९५ हजार ४८६ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४९ हजार ४७२ झाली आहे.
१४ दिवसानंतर सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांपेक्षा कमी
पुण्यात १० दिवसांपूर्वी म्हणजे १० एप्रिलला कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त झाली होती. आठ दिवस वाढत जाऊन १८ एप्रिलला ५६,६३६ वर गेली होती. त्यानंतर सहा दिवस सातत्याने सक्रिय रुग्णसंख्या कमी होत गेली असून शनिवारी ४९,४७२ पर्यंत खाली आली आहे.
-------------
चाचण्यांचा आकडा पोचला २० लाखांच्या पार
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २२ हजार २२७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २० लाख १३ हजार ७०३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.