लोणावळा : भुशी धरण व लायन्स पॉईट परिसरात शनिवार रविवार तसेच सलग सुट्टयांच्या काळात होणारी पर्यटकांची गर्दी व वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाचनंतर बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली.भुशी धरण व लायन्स पॉइंट या ठिकाणी वर्षाविहाराकरिता शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने या मार्गावर सुमारे पाच ते सहा किमी अंतरापर्यंत वाहतूक कोंडी होऊन पर्यटकांना तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. तसेच या परिसरात पायी येणार्या पर्यटकांची संख्या देखील मोठी असल्याने रस्त्यावरून चालणे देखील मुश्कील होत आहे.पर्यटकांच्या सुरक्षेकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह भुशी धरण व लायन्स पॉइंट यासह भाजे, लोहगड, गिधाड तलाव ही सर्व पर्यटनस्थळे सायंकाळी सहा नंतर पर्यटकांना बंद केली जाणार आहे. अवजड वाहनांना यामध्ये ट्रक, टेम्पो, बस, मिनी बस यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवसात शहरात प्रवेश बंद असणार आहे. पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर वर्षाविहाराचा आनंद घेताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, महिलांची छेडछाड करणे, अश्लील शेरेबाजी करणे सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणे, धांगडधिंगा घालणे, दारू प्राशन करणे, हुक्का ओढणे असे प्रकार करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे शिवथरे यांनी सांगितले. पर्यटनस्थळांवर पोलीस बंदोबस्तासह साध्या वेशातील पोलीस देखील नेमण्यात आले असून ते या हुल्लडबाजांवर कारवाई करणार आहेत.
शनिवार आणि रविवार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग सायंकाळी पाच नंतर बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 9:50 PM