पुणे : न्यू कोपरे गावातील पुनर्वसनापासून वंचित असलेल्या कुटुंबांचे गेल्या १६ वर्षांत पुनर्वसन झालेले नाही, त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी युवक क्रांती दलाने खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर सोमवारपासून अखंड सत्याग्रह बैठकीचा एल्गार पुकारला आहे. युक्रांदचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह प्रकल्पग्रस्त चोवीस तास बैठा सत्याग्रह करणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना डॉ. सप्तर्षी म्हणाले, न्यू कोपरे गावात हद्द वाढवायची आहे त्यामुळे गावातील लोकांचे पुनर्वसन करावे लागेल, असे शासनाने सांगितले. या शासकीय प्रकल्पासाठी १९८९मध्ये न्यू कोपरे गावाचे सर्वेक्षण करुन ४0१ लोकांची यादी तयार करण्यात आली़ यासाठी शासनाने प्रायव्हेट भागीदारी केली. २००१मध्ये ३६६ प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनांतर्गत घरे मिळाली़ मात्र १५ कुटुंबे अद्यापही वंचित राहिली आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी युवक क्रांती दलाने पुढाकार घेतला आहे़ जिल्हाधिकारी आणि विकसक खासदार संजय काकडे यांच्याबरोबर वारंवार चर्चा केल्या़ काकडे यांनी या कुटुंबांचे तत्काळ पुनर्वसनाचे आश्वासनही दिले़ परंतु, त्यांच्याकडून पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु होत नाही़ संवादाचे सर्व टप्पे संपल्यानंतर शेवटी सत्याग्रहाचा निर्णय युक्रांदनी घेतला आहे. न्यू कोपरे गावातील प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसनापासून वंचित कुटुंबांच्या हक्काच्या घरांसाठी हा सत्याग्रह पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत त्यांना घरे मिळत नाहीत तोपर्यंत हा अखंड सत्याग्रह चालूच राहणार आहे. आमचे संजय काकडे यांच्याशी शत्रुत्व नाही, मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावावे हा सत्याग्रहामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, संजय काकडे यांच्या कार्यालयाचे दरवाजे दिवसभर बंदच होते.
संजय काकडेंविरुद्ध सत्याग्रह
By admin | Published: April 18, 2017 3:07 AM