पुणे - महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची नुकतीच पदोन्नतीवर केंद्रात बदली झाली आहे. बदली होऊन देखील त्यांनी आयुक्त पदाचा भार सोडला नव्हता. परंतु गुरुवारी (दि.५) रोजी अखेर कुणाल कुमार यांना आयुक्तपदावरून पदमुक्त झाले. पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी लवकरच पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात सुरु आहे. येत्या तीन-चार सौरभ राव यांच्या नियुक्तीचे आदेश येतील अशीही चर्चा आहे.कुणाल कुमार यांचा आयुक्त पदावर व सौरभ राव यांचा जिल्हाधिकारी पदावरील प्रशासकीय कार्यकाळ एक वर्षांपूर्वीच पूर्ण झाला आहे.आता प्रशासकीय बदल्याचा हंगाम सुरु झाल्याने दोघांच्या बदल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यात कुणाल कुमार यांना पदोन्नती देऊन त्यांची केंद्रात बदली करण्यात आली. अधिवेशन सुरु असल्याने शासनाकडून पदमुक्तीचे आदेश न आल्याने कुणाल कुमार यांनी महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सोडला नव्हता.दरम्यान चंद्रकांत दळवी निवृत्त झाल्याने विभागीय आयुक्त पद रिक्त झाले असून, जिल्हाधिकारी पद देखील रिक्त होणार आहे. यामुळे सध्या या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर कोण येणार यांची चर्चा सुरु आहे. यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही पदांवर आपल्या विश्वासातील व्यक्तींची नियुक्ती करणार असल्याची चर्चा आहे.
महापालिका आयुक्तपदी सौरभ राव?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:51 AM