प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या माध्यमातून गेली अनेक सांस्कृतिकनगरीमध्ये सप्तसुरांची मनसोक्त उधळण होत असते. सूर, ताल आणि लय यांचा अनोखा संगम महोत्सवाच्या माध्यमातून होत असतो. आजवर अनेक दिग्गजांचा कलाप्रवास या स्वरमंचावर उलगडला आहे. हाच कलाप्रवास युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून संकलित करण्यात आला आहे. भीमसेनी स्टुडिओज हे यू-ट्यूब चॅनेल लवकरच सुरू करण्यात येत आहे. कलाकारांच्या सांगीतिक गप्पा या चॅनेलवर पहावयास मिळणार आहेत. महोत्सवात शनिवारी या चॅनेलचे उदघाटन होणार आहे. भारतीय संस्कृतीला शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा लाभली आहे. अनेक घराण्यांनी अभिजात संगीताच्या परंपरेचा वारसा वृद्धिंगत केला. कलाकारांनी हा वारसा समर्थपणे पेलला. भारतातील नामवंत कलाकारांची गायकी, वादन उलगडणारे अनेक व्हिडीओ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कलेचा रसिकांना आस्वाद घेता येतो. मात्र, कलाकारांची तपश्चर्या, संगीतसेवा, जडणघडणीचा प्रवास संगीत रसिकंपर्यंत फारसा पोचत नाही. हा प्रवास सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशाने युट्युब चॅनेलची संकल्पना साकारली जात आहे.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे यंदा ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाअंतर्गत भारतभरातील दिगग्ज आणि ख्यातनाम, कलाकार आपली कला सादर करतात. कलाकाराची जडणघडण, कलेची जुळलेली नाळ, गुरुंची शिकवण, घराण्याची परंपरा, तरुणाईमधील संगीताची आवड अशा विविध विषयांचे पदर यादरम्यान उलगडले जाणार आहेत. या सर्व मुलाखती युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून रसिकांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. महोत्सवात येणाऱ्या कलाकारांचे आठ-नऊ मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करण्यात येणार आहेत. ते म्हणाले, युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांच्या मुलाखती, तसेच संवादात्मक कार्यक्रम आदींची ३५-४० एपिसोडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून जगभरातील रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. एका क्लिकवर या मुलाखती पाहता येऊ शकतील. शनिवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये या टयूब चॅनेलचे अनावरण होणार आहे.
यूट्यूब चॅनेलमधून उलगडणार ‘सवाई ’ चे अंतरंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 4:14 PM
युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जगभरातील रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.
ठळक मुद्दे युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कलाकारांच्या मुलाखती, संवादात्मक कार्यक्रम विभागणी शनिवारी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये या टयूब चॅनेलचे अनावरण होणारकलाकारांचे आठ-नऊ मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करण्यात येणार