प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : गायन, वादन, नृत्य यांचा अनोखा मिलाफ असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या जादुई स्वरमंचावरील सादरीकरण हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. दिग्गजांच्या सादरीकरणाने पावन झालेल्या या स्वरमंचावर पहिलेवहिले सादरीकरण उत्साह आणि चैतन्याचा प्रवाह जागवणारे आहे. गुरुंच्या आशीर्वादाने या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न असल्याच्या भावना सरोदवादक बसंत क्राबा, बनारस घराण्याच्या गायिका डॉ. रिता देव आणि पंजाबचे गायक रागी बलवंत सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.ज्येष्ठ सतारवादक अन्नपूर्णादेवी यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ६० वर्षीय बसंत काब्रा सरोदवादक करणार आहेत.काब्रा यांचे वडील दामोदरलाल हे उस्ताद अकबर अली खाँ यांचे पहिले शिष्य. मूळचे जोधपूरचे असलेल्या काब्रा यांनी वडिलांकडून सरोदवादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षी ते गुरुमाँ अन्नपूर्णादेवी यांच्याकडे शिकण्यासाठी रवाना झाले. मैहार-सेनिया घराण्याची खासियत त्यांच्या वादनातून झळकते. ते म्हणाले, ‘तीन वर्षांपूर्वी पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आलो होतो. तेव्हाच पुणेकर रसिकांची मिळालेली दाद थक्क करणारी होती. सवाईच्या स्वरमंचावरील सादरीकरण ही आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोच्च पर्वणी आहे. या स्वरमंचाच्या रुपाने दिग्गजांचा आशीर्वाद मिळवण्याचे भाग्य लाभले आहे. सरोदवादनामध्ये सूर-स्वरांच्या तयारीबरोबरच रागाची प्रकृती समजून घेणे आवश्यक असते.’ज्येष्ठ गायिका गिरिजादेवी यांच्या शिष्या डॉ. रिता देव महोत्सवाच्या दुस-या दिवसाची सुरुवात करणार आहेत. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील त्यांचे हे पहिलेच सादरीकरण. लहानपणापासून त्यांनी निर्मल आचार्य यांच्याकडे संगीताचा श्रीगणेशा केला. आसाममधून बनारसला आल्यानंतर चित्तरंजन ज्योतिषी यांच्याकडून शिक्षण घेतल्यावर वयाच्या विसाव्या वर्षी त्या गिरिजादेवी यांच्याकडे गेल्या. बनारस घराण्यामध्ये शिष्य परिपक्व झाल्याची खात्री पटल्यावर बुजूर्गांसमोर मंचप्रदर्शन करुन परीक्षा घेतली जाते आणि शिष्याच्या हातात ‘गंडा’ बांधला जातो. गिरिजादेवींनी स्वत: रिता देव यांच्या हातावर ‘गंडा’ बांधला आहे. त्या म्हणाल्या, ‘बनारस घराण्याचे गायन चौमुखी आहे. ख्याल, धृपद, खमाज, ठुमरी, दादरा, होरी असे वैविध्य घराण्यात पहायला मिळते. मी सवाईमध्ये गिरिजादेवी यांचे स्मरण करुन ख्यालपासून सुरुवात करेन. वेळ असल्यास ठुमरी किंवा दादरा पेश करणार आहे.’रागी बलवंत सिंग तिस-या दिवशी तलवंडी घराण्याची खासियत गायनातून उलगडणार आहेत. ते म्हणाले, ‘मी याआधी अनेकदा पुण्यात येऊन गेलो आहे. मात्र, सवाईच्या स्वरमंचावर पहिल्यांदाच विराजमान होणार आहे. सदगुरु जगजित सिंग यांच्याकडून मला तलवंडी घराण्याची गायकी शिकायला मिळाली. तबला, पखवाजच्या साथीने पंजाबी संगीताची गोडी उलगडत जाते. तलवंडी घराण्याची धृपद गायकी लोकप्रिय आहे. हीच गोडी गायनातून रसिकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करेन.’
सवाईचा स्वरमंच...उत्साह आणि चैतन्याचा प्रवाह..!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 12:16 PM
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या जादुई स्वरमंचावरील सादरीकरण हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते.
ठळक मुद्देकलाकारांच्या भावना : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पहिलेवहिले सादरीकरणसरोदवादक बसंत क्राबा, गायिका डॉ. रिता देव, गायक रागी बलवंत सिंग यांचा ‘लोकमत’शी संवाद