सावरकरांची दहशत ब्रिटिशांना, काँग्रेसला आहे अन् ती वाढली पाहिजे; शरद पोक्षेंचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 04:15 PM2022-07-24T16:15:22+5:302022-07-24T16:20:41+5:30
सावरकर अभिवाचन कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे
पुणे : भारतात फार मोठी माणसे होऊन गेली. मात्र एवढ्या मोठ्या देशभक्तांमध्ये जेवढा अपमान सावरकर यांचा केला. तो आतापर्यंत कोणाचाच झाला नसेल. यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती. काँग्रेसला पण आहे अन् ती दहशत वाढली पाहिजे असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय येथे मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकर नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमात ते बोलत होते.
पोंक्षे म्हणाले, सावरकर प्रेमींचा एक प्रॉब्लेम असा की कोणी विरोधात बोललं तरी त्याला उत्तर देण्याची ताकद आणि शब्द नसतात. सध्या उत्तर देणारे कमी आणि आक्षेप घेणारे जास्त आहेत. ते जाणीवपूर्वक करतात याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर याचं मोठेपण मान्य करणे म्हणजे त्यांना राजकीय तोटा वाटतो. कितीही सागितले तरी ते ऐकणार नाहीत. आताच्या कार्यक्रमाला राजकीय व्यक्ती आला नाही तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सावरकरांवर मनापासून प्रेम करणारी माणसे हवीत.
महाराष्ट्र शासनाला शाळांमध्ये हे कार्यक्रम घ्यायला लावू
सावरकर अभिवाचन कार्यक्रमाचे लोन महाराष्ट्रभर पसरले पाहिजे. मंत्रिमंडळ स्थापन झाले की माझे खूप जवळचे स्नेही आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मी या कार्यक्रमाची डीव्हीडी जबरदस्तीने बघायला लावेन. सावरकरांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम महाराष्ट्रातील शाळेत कार्यक्रम झाले पाहिजे. दोन बस घेऊन प्रयोग झाले पाहिजेत. इथं असणारे सगळे सावरकर प्रेमी आहोत. जिथं अनेक शाळेत सावरकर फोटो लावला जात नाही आणि धडा शिकवला जात नाही. महाराष्ट्र शासनाला शाळांमध्ये हे कार्यक्रम घ्यायला लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.