पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जर विकृत भाषण करत असतील तर राज्यपाल पदावर किंवा देशातील कोणत्याही जबाबदार पदावर राहण्याचा अधिकार त्यांना नाही. इतिहास काय आहे याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, खरा इतिहास पुढे आला पाहिजे. इतिहास खोट्या पद्धतीने मांडण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कारस्थान लावलं आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, ३० नोव्हेंबरलला नाशिक येथे संभाजी ब्रिगेडचा मेळावा आहे, तिथं आम्ही महाराजांचं स्मारक याविषयी ही चर्चा करणार आहोत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची हेळसांड केलेली चालणार नाही. 'मुद्द्याला मुद्दा अन् गुद्द्याला गुद्दा' हेच आमचं ब्रीदवाक्य आहे.
राज ठाकरेंनी RSS ची सुपारी घेतली आहे का?
हर हर महादेव चित्रपटातून खोटा इतिहास, विकृती दाखवण्याचं काम आताच्या सरकारनं केलं आहे. राज ठाकरे सुपारी घेऊन RSS चं काम करताहेत का? असा सवालही ब्रिगेडने केला. अनेक विषयांना ते स्वतः जातीय रंग देत असतात. जातीय दहशतवाद निर्माण करण्याचं काम राज ठाकरे यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या आहेत, असा आरोपही यावेळी संभाजी ब्रिगेडने यावेळी केला.
"सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हते"
सावरकर हे कधीही स्वातंत्र्यवीर नव्हतेच. लोकांनी त्यांना तसं दाखवलं. शिवसेना आणि आमच्यात या विषयावर कधीही वाद होणार नाहीत. त्यांचे विचार वेगळे आमचे विचार वेगळे आहेत. युती करतानाच यावर आमचं स्पष्ट बोलणं झालं आहे.