चासकमान : साबुर्डी (ता. खेड) देशमुखवाडी येथील दत्तात्रय नामदेव देशमुख यांच्या घराजवळील शेततळ्यात पडलेल्या हरिणाच्या पाडसाला पाण्याबाहेर काढून गावातील युवकांनी त्याचे प्राण वाचविले.
साबुर्डी गावातील देशमुखवाडी येथील शेततळ्यात हरिणाचे पाडस पडल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली होती. स्थानिक युवकांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर युवकांनी पाडसाला तळ्यातून सुखरुप बाहेर काढले. साबुर्डी गावातील सरपंच पंढरीनाथ गायकवाड, प्राणीमित्र आझाद देशमुख, सागर गायकवाड, भरत सांडभोर, गणेश वाळुंज, जयेश सावंत, अतुल सावंत, धीरज देशमुख, प्रतीक देशमुख, संदेश वाळुंज, शरद देशमुख, अनिकेत चकोर या तरुणांनी वन विभागाला माहिती देऊन वन विभागाचे अधिकारी वाढाणे व त्यांच्या सहकाºयांकडे पाडस सुपूर्द केले.तळ्यात पडलेल्या पाडसावर प्रथम उपचार करून त्यास अभयारण्यात सोडण्यात येईल, असे वनाधिकाºयांनी सांगितले. तरुणांनी दाखविलेल्या कामगिरीचे अधिकाºयांबरोबरच ग्रामस्थांनी युवकांचे आभार मानून कौतुक केले. खेड तालुक्याचा पश्चिम भाग हा निसर्गसौंदर्याने नटलेला असून, परिसरात मोठ्या प्रमाणात घनदाट वृक्ष व उंच झाडी असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी पाहावयास मिळत असतात. परंतु सध्या पावसाने दडी मारली असल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढू लागला आहे.