- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पर्यावरण दिनानिमित्त वीज बचतीचा संकल्प करण्यात आला असून, सोमवार दिनांक ५ जूनला सायंकाळी ५ ते ६ या वेळेत शहरातील नागरिक आणि संस्थांनी वीज एक तासासाठी बंद ठेवावी, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे. महापालिकेच्या वतीने पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेमार्फत दिनांक ३ ते ९ जून २०१७ या कालावधीत विश्व पर्यावरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. पर्यावरण जागृतीबाबत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्या निमित्त पर्यावरण संवर्धन समिती, भावसार व्हिजन, ज्येष्ठ नागरिक संघ, निगडी, पिंपरी-चिंचवड सिटिझन फोरम, सायन्स पार्क, पोलीस मित्र संघटना, पिं. चिं. सोशल फाउंडेशन, पतंजली योग फाउंडेशन, संस्कार प्रतिष्ठान, इंद्रायणी सेवा संघ, लायन्स क्लब, भोजापूर, मॉर्डन हायस्कूल, निगडी, ब्रम्हकुमारी विद्यालय, निगडी, सी. एम. एस. स्कूल, चिंचवड मल्याळी समाज अशा १४ संस्थांची सायन्स पार्क येथे बैठक झाली. महापालिकेच्या बरोबरीने सामाजिक संस्थाही पर्यावरण संवर्धनाच्या कामात सहकार्य करणार आहे. या वेळी सह आयुक्त दिलीप गावडे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, कार्यकारी अभियंता आणि समन्वयक प्रवीण लडकत आहेत. या वेळी तुपे म्हणाले, ‘‘पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. विश्व पर्यावरण सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.’’महापौर नितीन काळजे म्हणाले, ‘‘पर्यावरण संवर्धन जबाबदारी नागरिक म्हणून आपलीही आहे. वीज बचत उपक्रमांत नागरिकांनी सहभागी व्हावे. सोमवारी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत सर्व नागरिक, संस्था यांनी वीज एक तासासाठी बंद ठेवावी. त्यातून वीज बचत होणार आहे. त्यात छंद निसर्ग अवलोकनाचा, घनकचरा व्यवस्थापन, अध्यात्मातून पर्यावरणाकडे, स्वच्छता जागृती फेरी, इ़ कचरा विल्हेवाट, पथनाट्य, पर्यावरण विषयांवर फिल्मशो, औषधी वनस्पती वृक्षारोपण, पर्यावरण जागृती व्याख्यान, कंपोस्ट खताबाबत कृती सत्र, महापालिका क्षेत्रात वृक्षारोपण आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.’’