वारजे : येथील आरएमडी सिंहगड शाळेसमोरील घोसाळे यांच्या गोठ्याजवळ नर जातीचे हरीण सापडले आहे. शेणात अडकलेल्या या हरणाचा भटके कुत्रे चावा घेत होते. मात्र हे दृश्य पाहताच गोठ्यातील कर्मचार्यांनी त्याची मृत्युच्या दाढेतून सुटका करत जीवदान दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डुक्करखिंडीजवळ बाह्यवळण महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या शेजारीच शिवाजी घोसाळे यांचा गोठा आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास येथील कर्मचारी गायी व म्हशींच्या धारा काढत असताना अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा व हरणाच्या विव्हळण्याचा आवाज आला. शिवाजी यांच्यासह कामगारांनी गोठ्याच्या मागच्या बाजूला धाव घेतली असता शेणाच्या ढिगाऱ्यात पाय रुतलेल्या हरणाचा भटकी कुत्रे चावा घेत असल्याचे दृश्य दिसले. यांनी लगेच त्या कुत्र्याला हाकलून लावले. मात्र तोपर्यंत हरणास बाजूला घेण्यासाठी त्याच्या गळ्यात व शिंगात दोरी अडकवत त्यास बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण भेदरलेले व पूर्ण वाढ झालेले हे हरीण जखमी अवस्थेतही बाहेर येताच हिसका व उंच उड्या मारून पळून जाण्याचं प्रयत्न करू लागले. अखेर त्यास दोन तीन जणांनी आधार देत गोठ्याजवळील शेळयांच्या पिंजर्यात सुरक्षितस्थळी नेऊन ठेवले. रात्री पावणे आठच्या सुमारास या ठिकाणी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट व वारजे पोलीस स्टेशनचे कर्मचारी राजू शेख व रविंद्र पवार दाखल झाले. त्यांच्या पाहणीत हरणाला पाठीला, तोंडाला व खालच्या बाजूस जखम झाल्याचे आढळले. यानंतर सुमारे तासभर पयत्न करून यास आधी वेदना शामक इंजेक्शन देऊन प्राथमिक उपचार व नंतर हरणाला भूल देऊन प्रयत्नपूर्वक पिंजर्यातून विभागाच्या रुग्णवाहिकेत नेण्यात आले. हरणाला पकडण्यासाठी कर्मचारी राहुल यादव लालचंद पाल, सर्पमित्र निखील दुर्गे, धर्मेंद्र नडगीर, अभिजित महाले, प्रतीक महामुनी, कुंदन रिठे यांनी कष्ट घेतले. भुगाव येथील केंद्रात या चितळावर काही दिवस उपचार करण्यात येणार असून तो बरा झाल्यावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात एनडीएमध्ये सोडण्यात येणार असल्याच्या माहिती पथकातील डॉ. सुकृत शिरभारे यांनी '' लोकमत '' ला दिली.
............................
सकाळपासूनच हे हरीण या भागात अनेक जणांना फिरत असल्याचे दिसले. काही दिवसपूर्वीच एनडीए जवळ प्रभात फेरीसाठी गेले असतान हेच हरीण दिसले होते आमच्या मोबाईल मध्ये त्याचा फोटोही तेव्हा आम्ही काढला आहे. आज मात्र त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले. - अजित घोसाळे, स्थानिक रहिवासी