पुणे / वाघोली : रविवारी रात्री आम्ही जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलो असताना अचानक मोठा आवाज आला आणि दुभाजकाला धडकून एक डम्पर काही लोकांना चिरडून माझ्या अंगावर आला. त्याखाली मी अडकलो, डम्पर पुढे गेला आणि पुढे झाड व दगड असल्याने तो तिथेच थांबला. त्याखाली मी अडकून पडलो होतो. ‘वाचवाऽऽ... वाचवाऽऽ... असं ओरडताच माझे नातेवाईक धावत आले आणि मला गाडीच्या चाकाखालून बाहेर काढले. काळ आला हाेता; पण वेळ आली नव्हती, याचा भयानक अनुभव काका मोहन भोसले (७५, रा. नाव्ही सांडस) यांनी सांगितला.
वाघोली परिसरात उदरनिर्वाह करण्यासाठी भंगार गोळा करून ते आपला उदरनिर्वाह करतात. माझ्या मुलाच्या दोन्ही किडन्या खराब असल्याने आमचे जगणे कठीण झाले आहे. माझी सून सुमन गणेश भोसले मिळेल ते काम आणि भंगार गोळा करून आम्हाला जगवते. रविवारी रात्री आम्ही जेवण करून रस्त्याच्या कडेला झोपलो असताना अचानक मोठा आवाज आला आणि दुभाजकाला धडकून डम्पर काही लोकांना चिरडून माझ्या अंगावर आला. त्याखाली मी अडकलो, डंपर पुढे गेला. पुढे झाड व दगड असल्याने तो तिथेच थांबला त्याखाली मी अडकलो होतो. वाचवा वाचवा म्हटल्याने माझे नातेवाईक तिथे आले अन् मला वाचवले.
माझ्या चिमुरड्याचा चेहरा डाेळ्यांसमोरून हटतच नाही हाे!
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात अमरावती येथून शेतीचा हंगाम संपल्यावर आम्ही पुण्यात रोजगारासाठी येत असतो. गेल्या ४ वर्षांपासून आम्ही याठिकाणी बिगारी काम करण्यासाठी येत असून, येथेच पाल बांधून राहतो. रात्री अकराच्या सुमारास आम्ही याठिकाणी झोपलो होतो. मात्र, सकाळ उजाडण्यापूर्वीच आम्हाला हा दिवस पाहावा लागला. अवतीभोवती खेळत असलेल्या चिमुरड्यांचा चेहरा वारंवार आठवतोय, अशी भावना मृतांचे नातेवाईक हिंदुजा पवार यांनी व्यक्त केली.
कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणार
पारधी समाजाच्या लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वाघोली येथे अपघात झालेल्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अपघातस्थळी वास्तव्यास असलेल्या इतर नागरिकांशी संवाद साधला. अपघाताची संपूर्ण माहिती पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडून उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांसह पोलिस निरीक्षक पंडित रेजीवाड, पारधी समाजाचे कार्यकर्ते नामदेव भोसले यांची उपस्थिती होती.