पुणे : “कोरोनामुळे शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. त्यामुळे आपणही त्या दान करून दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो. याची माहिती मिळताच एका रुग्णाला प्लाझ्माची गरज आहे असे समजले, त्याच वेळी प्लाझ्मा दान करायला गेलो. डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्षभरात आतापर्यंत ६ वेळा प्लाझ्मा दान करून बारा जणांचे जीव वाचविण्याचे भाग्य मिळाले,” असे अकबर पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
“कोरोनाचा पहिला काळ खूपच कठीण गेला. त्यावर कोणतेही प्रभावी औषध नव्हते. यामुळे कोरोना झाला तर कसे होणार याची भीती मनामध्ये होती. दुर्दैवाने कोरोनाची लागण झालीच. रुग्णालयात पंधरा दिवस राहावे लागले. या वेळी घरच्यांना आणि स्वतःला झालेला त्रासामुळे खूप मोठ्या वाईट अनुभवाला समोरे जावे लागले. अशी वेळ शत्रूवरही येऊ नये, अशी प्रार्थना करून रुग्णालयातून घरी परतलो,” असे सांगताना ते पठाण भारावले.
प्लाझ्मा दान करणे म्हणजे रक्तदान करणे असे सुरुवातीला वाटत होते. मात्र रक्त काढून घेतल्यानंतर त्यातून प्लाझ्माचा घटक काढून घेतला जातो आणि पुन्हा ते रक्त शरीरात सोडले जाते. त्यामुळे शरीराला कोणताही धोका जाणवत नाही. एक दिवस आराम केला की पुन्हा ताजेतवाने वाटते. आपण कोणाचा तरी जीव वाचवत आहोत ही भावना समाधान देते. यात जात-धर्माचा कुठेही संबंध नाही, असे पठाण सांगतात. कोरोनामुळे आपल्याला त्रास झाला हे खरे असले तरी त्यातून बरे झाल्यावर हाच कोरोना दुसऱ्याचा जीव वाचवायला मदत करतो ही बाब चकित करणारी असल्याचे ते म्हणाले.
पुढे ते सांगतात की, सध्या जरी लस बाजारात आली असली तरी सर्वांनाच मिळतेय असे नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे. जर आपण पुढे होऊन प्लाझ्मा दान केले तर दुसऱ्याचा बहुमूल्य जीव वाचविण्यासाठी आपण कामी येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील तयार झालेल्या अँटीबीडीज उपयोग स्वतःसह दुसऱ्यासाठी उपयोग करा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
चौकट
“शहरातील कोरोनामुक्त व्यक्तींचा व्हाॅट्सअॅप ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून ज्या रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे, त्यांच्यापर्यंत प्लाझ्मा दाते पोहोचून त्यांची मदत करतात, तेही एक पैसाही न घेता. त्यामुळे अनेकांचे जीव वाचविण्याचे भाग्य या ग्रुपमधील सदस्यांना मिळाले आहे. या ग्रुपमध्ये सव्वादोनशे सदस्य असून रक्तदान, प्लाझ्मादान यासाठी ते मदत करतात. आतापर्यंत सुमारे ५० ते ६० व्यक्तींना प्लाझ्मादान करता आले,” असे ग्रुप अॅडमिन प्रवीण प्रधान यांनी सांगितले.