पुणे :महावितरणच्यापुणे परिमंडलातील ९२ हजार ८१३ ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे वर्षाला तब्बल १ कोटी ११ लाख ३७ हजार ५६० रुपयांची बचत होत आहे. 'गो-ग्रीन' योजनेंतर्गत हे ग्राहक केवळ 'इ-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय वापरत आहेत. पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी राज्यात या योजनेमध्ये आघाडी घेतली आहे. गेल्या २० दिवसांमध्ये पुणे परिमंडलात २ हजार ६८१ ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येते. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते 'गो-ग्रीन'मधील ग्राहकांना 'ई-मेल'द्वारे पाठविण्यात येते. सोबतच 'एसएमएस'देखील पाठविला जातो. याद्वारे ग्राहकांना लगेचच वीजबिलाची माहिती देण्यात येते.
पुणे ग्रामीण मंडलअंतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १६ हजार १२२ ग्राहकांनी 'गो-ग्रीन'मध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४३५३ ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.
'गो-ग्रीन' योजनेत सहभागी ग्राहक
उपविभाग ग्राहकसंख्या
हडपसर-१५,५४४
वडगाव धायरी ४,८७५
धनकवडी ४,५७१
विश्रांतवाडी ३,६५८
पुणे शहर एकूण ४९, ४९२ ग्राहक
सांगवी ८,३१९
आकुर्डी ५,१६४
चिंचवड ५,३४२
पिंपरी-चिंचवड एकूण २७, १९९
‘गो ग्रीन’मध्ये असा घ्या सहभाग
योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.
'गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे’ असे आवाहन करण्यात आले आहे.
- राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण.