लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोमवारी सायंकाळी स्वीकारला. डॉ. वासुदेव गाडे यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांच्याकडून डॉ. शिंदे यांनी प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे पुणे विद्यापीठात स्वीकारली.पुणे विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया कुलपती कार्यालयाकडून सुरू आहे. त्यांच्या निवडीपर्यंत कुलगुरू डॉ. शिंदे यांचा प्रभारी कार्यकाळ असणार आहे. डॉ. शिंदे म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती श्री. चे. विद्यासागर राव यांनी सावित्रीबाई फुल,े पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी सोपवून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृ तज्ञता व्यक्त करतो. या महाराष्ट्राच्या भूमीवर शैक्षणिक सेतू म्हणून काम करण्याची या निमित्ताने मला संधी लाभली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीकडून राजर्षी शाहू महाराज यांच्या भूमीकडे आणि छत्रपती शिवराय यांच्या नावाच्या विद्यापीठात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला काम करण्याची संधी लाभली. आज पुन्हा हा प्रवास महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई यांच्या कर्मभूमीकडे होतो आहे, ही माझ्या आयुष्यातील अद्वितीय अशी घटना आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे आणि त्या विद्येचे केंद्र असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला अलौकिक वारसा आहे. या विद्यापीठाचे प्रभारी का असेना पण कुलगुरू पद भूषवावयास मिळणे, ही अत्यंत अनमोल बाब आहे. कार्यक्रमास पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण, वित्त व लेखाधिकारी विद्या गारगोटे, आदी मान्यवर उपस्थित होते.शिक्षण सेतू सांधण्याची संधीऔरंगाबाद-कोल्हापूर-पुणे असा एक नवा शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा सेतू सांधण्याची संधी या निमित्ताने मला लाभली आहे. तिचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी देवानंद शिंदे
By admin | Published: May 16, 2017 1:17 AM