पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या २२ ते २४ एप्रिल आणि २८ ते ३० एप्रिल दरम्यान होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. परीक्षेचे नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पुढील लवकरच जाहीर करण्यात येईल.लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे २२ ते २४ एप्रिल तसेच २८ ते ३० एप्रिल दरम्यान ठेवण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध अभ्यासक्रमांच्या या दरम्यान येणाऱ्या पेपरचा आढावा घेऊन सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे परीक्षा विभागाच्यावतीने निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या बहुतांश परीक्षा या एप्रिल व मे महिन्यात पार पडतात. त्याचदरम्यान लोकसभा निवडणुकांच्या तारखा एकाच वेळी आल्याने त्यामध्ये मोठे बदल करावे लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान राज्यात चार टप्प्यात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया तीन जिल्ह्यांमध्ये मात्र २३ व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकांमध्ये बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 2:42 AM