पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या आवारात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटलीबंद पाणी वापरण्यास बंदी घालण्यात आली असून त्याबाबत विद्यापीठाकडून परिपत्रकही काढण्यात आले. परंतु, विद्यापीठ आवारातील उपाहारगृहांत सर्रास प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा, पिशव्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने काढलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशाला विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांकडूनही ठेंगा दाखविण्यात येत असल्याचे दिसून येते.शिक्षण संस्थांमध्ये प्लॅस्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाच्या आवारात बाटलीबंद पाणी, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्यास बंदी घातली होती. परंतु, विद्यापीठ आवारातील बहुतांश सर्व उपाहारगृहांमध्ये बाटलीबंद पाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच, विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थी अन्नपदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घेऊन येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे विद्यापीठ परिसरात कुठेही प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि पिशव्या टाकल्या जातात. परिणामी, विद्यापीठाचा परिसर अस्वच्छ होतो.प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. तसेच, प्लॅस्टिकऐवजी इतर धातँच्या पाण्याच्या बाटल्या वापराव्यात, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले होते. परंतु, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने काढलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या आदेशाला एक प्रकारे केराची टोपली दाखविली असल्याचे दिसून येत आहे.......विद्यापीठ प्रशासनाने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बाटलीबंद पाणी वापरण्यावर प्रतिबंध घातला. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्लॅस्टिकबंदच्या निर्णयाचे उल्लंघन करणाºयावर कारवाई केली जाणार आहे.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या प्लॅस्टिकबंदीला ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 12:17 PM
विद्यार्थी, कर्मचारी, उपहारगृह चालकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर
ठळक मुद्देप्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापराव्यात, असे आवाहन