पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शासन निर्देशानुसार संलग्न महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६५० महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणते व किती शुल्क आकारावे व कोणते आकारू नये, याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कोरोनामुळे पुण्यासह राज्यभरातील महाविद्यालये सुमारे दीड वर्षांपासून पूर्णपणे बंद आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. महाविद्यालयांकडून दिल्या जाणा-या विविध सुविधांचा लाभ विद्यार्थी घेत नसल्याने महाविद्यालयीन शुल्कात कपात करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात होती. राज्य शासनाने शासकीय महाविद्यालयांच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी झाली. परंतु, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या शुल्काबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.
शासन आदेशानुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. डॉ. व्ही. बी. गायकवाड व डॉ. संजय चाकणे हे या समितीचे सदस्य होते. या समितीने दिलेल्या अहवालानंतर विद्यापीठाने शुल्क कपातीचा निर्णय जाहीर केला.
चौकट
विद्यापीठाने कोणत्या शुल्कात केली कपात
कमी केलेल्या शुल्काची टक्के
ग्रंथालय ५०
प्रयोगशाळा ५०
जिमखाना ५०
विद्यार्थी कल्याण निधी ७५
अभ्यासेतर उपक्रम ५०
परीक्षा २५
औद्योगिक १००
कॉलेज नियतकालिक १००
विकास निधी २५
प्रयोगशाळा ठेव १००
इतर ठेव १००
आरोग्य तपासणी १००
आपत्कालीन व्यवस्थापन १००
अश्वमेध १००
संगणक सुविधा ५०
----------------------------
चौकट
“शासनाने विद्यापीठांना शुल्क कपातीचे आदेश दिले होते. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाच्या धरतीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शुक्लात कपात केली आहे. शिक्षण शुल्कात कोणतीही कपात केलेली नाही. तसेच ऑक्टोबरपासून महाविद्यालये नियमितपणे ऑफलाईन सुरू झाले तर विद्यार्थ्यांकडून पूर्वीप्रमाणे उर्वरित महिन्यांसाठीचे शुल्क नियमानुसार आकारता येणार आहेत.
- सुधाकर जाधवर, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
---------------------------------
विद्यापीशी संलग्न महाविद्यालयांची संख्या
पुणे : ३८८
अहमदनगर : १३१
नाशिक : १५८
------------------------