पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस येत्या १२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना ८ तारखेला दुपारी ३ ते ६ पर्यंत तसेच ९ व १० तारखेस सकाळी १० ते सायं.६ पर्यंत सराव चाचणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील सुमारे १ लाख ९७ हजार विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा सराव करता यावा, यासाठी विद्यापीठातर्फे सर्वसाधारण क्षमता आकलन पद्धतीच्या प्रश्नांवर आधारित ६० प्रश्नांची व ५० गुणांची एक तासाची चाचणी परीक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत काही अडचण असल्यास त्यांनी ९७१७७९६७९६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.https://sppu.wheebox.com/LOGIN-2/sppu.jsp या युआरएलचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने चाचणीचा सराव करता येईल.
प्रत्येक विद्यार्थ्याला सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत एका दिवसात किमान पाच वेळा सराव करता येईल. परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सर्व माहिती त्यांच्या स्टुडंट प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विषय निहाय सराव प्रश्नसंच स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही काकडे यांनी कळविले आहे.