पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ दि. २० जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या समारंभाची जोरदार तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. विद्यापीठाच्या हजारो विद्यार्थ्यांना या दिवशी पदवी प्रदान केली जाणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आता वर्षातून दोन पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यापैकी जानेवारीत होणारा प्रदवी प्रदान समारंभ हा खूप मोठा असतो. एप्रिल-मे दरम्यानच्या नियमित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी दिल्या जातात. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते, त्यामुळे तो पदवी प्रदान सोहळा अगदी छोट्या पातळीवर पार पडतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असते. त्यामुळे पदवी प्रदान समारंभा दिवशी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी उसळत असते. सर्वच विद्यार्थ्यांना विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी घेण्यासाठी न बोलाविता महाविद्यालय स्तरावर पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात येऊ लागल्याने आता ही गर्दी आटोक्यात आली आहे. पदवी मिळाल्यानंतर गाऊन आणि टोपी घालून फोटो काढण्याची मोठी झुंबड कॅम्पसमध्ये उडते.
शेलारमामा सुवर्णपदक यंदा नाहीचपदवी प्रदान समारंभामध्ये गुणवान विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येते. शाकाहाराची अट घालण्यात आलेले शेलारमामा सुवर्णपदकावरून प्रचंड वादंग झाले होते. त्यानंतर डॉ. नितीन करमळकर यांनी शेलारमामा यांच्या नातेवाइकांशी चर्चा करून शाकाहाराची अट रद्द होईपर्यंत हे सुवर्णपदक स्थगित ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र ती प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने यंदाच्या पदवी प्रदान समारंभात शेलारमामा सुवर्णपदक दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.