पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील शेकडो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय विद्यापीठाबाहेर ये-जा करत आहेत. मात्र, असे बेजबादारपणे वागणे म्हणजे जबाबदारीने वागणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचे आरोग्य धोक्यात आणण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूवारी रात्रीपासून विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार व जनरल जोशी गेट (खडकी गेट) अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.विद्यापीठ प्रशासनाने सुद्धा विद्यापीठ आवारात भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.परंतु, विद्यापीठातील वसाहतीमध्ये वास्तव्यास असणारे काही कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय या परिस्थितीतही बेजबादारपणे वागत आहेत.त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार व खडकी गेट बंद रहाणार असल्याचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यापीठातील सेवकांसाठी काढण्यात येत आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विद्यापीठाकडून कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत.त्यामुळे कर्मचा-यांना काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचे असल्यास तर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून पास घेऊनच बाहेर पडता येणार आहे. तसेच एका कुटुंबासाठी आठवड्यातून केवळ दोन वेळा पास दिला जाणार आहे.आयुका प्रवेशद्वातून प्रवेश दिला जाणार नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी.केवळ रूग्णवाहिकेतून उपचारासाठी रूग्णांना बाहेर सोडले जाईल.