पुणे: जागतिक पातळीवरील शैक्षणिक संस्थांच्या 'क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२' मध्ये सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ आता ६५० ते ७०० च्या क्रमवारीतून ५९१ ते ६०० च्या क्रमवारीत पोहोचले आहे. यंदाच्या वर्षीची क्रमवारी बुधवारी (दि.९) जून रोजी जाहीर झाली. जगभरातील १ हजार ३०० शिक्षण संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून यामध्ये भारतातील ३५ शिक्षण संस्थांची निवड झाली आहे.त्यात आयआयटी संस्थांचाही यात समावेश आहे.
'क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग' ही जागतिक पातळीवर अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रमवारी ( रँकिंग)असून गेली काही वर्षे सातत्याने या जागतिक क्रमवारीतील नामांकित संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश होत आहे.
नुकतीच 'टाईम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग' जाहीर झाली होती. त्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्या दोनशे शैक्षणिक संस्थेच्या क्रमवारीत स्थान मिळवले आहे. त्यातच आता जागतिक स्तरावरही पहिल्या ६०० च्या आत आल्याने पुणे विद्यापीठाची मान आणखी उंचावली आहे.---------२०२० मध्ये विद्यापीठ ८०० च्या क्रमवारीत होते. मागील दोन वर्षात विद्यपीठ २०० क्रमाने वर आले असून एक प्रतिष्ठित विद्यापीठ म्हणून नावारूपाला येण्याचा बहुमान विद्यापीठाने मिळवला आहे. या रँकिंग मुळे 'इन्स्टिट्युशन ऑफ एमिनन्स' साठीची विद्यापीठाची दावेदारी अधिक प्रबळ झाली आहे.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ---------
यावर्षी विद्यापीठ रॅंकिंग मध्ये १०० क्रमाने वर पोहोचलो असून याचा नक्कीच आनंद आहे. मात्र, याहूनही प्रचंड सामर्थ्य आपल्याकडे आहे. आताच्या नव्या शैक्षणिक धोरणात आपण अनेक गोष्टींची पुनर्बांधणी केली आहे. 'मल्टी डिसीप्लीनरी रिसर्च' च्या निकषात आपण सहभागी झालो तर अधिक वरच्या क्रमवारीत आपण येऊ शकतो. तरीही या मिळालेल्या क्रमावरीचा मनस्वी आनंद आहे. यात विद्यापीठातील ज्या सहकाऱ्यांनी यामध्ये योगदान दिले त्या सर्वांचे अभिनंदन.- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ