पुणे : जगातील सर्वाेत्तम विद्यापीठ, शिक्षणसंस्थांचा समावेश असलेले क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंग-२०२५ जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रँकिंग ६३१ ते ६४० यादरम्यान असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा त्यामध्ये सुधारणा झाली आहे. गतवर्षी २०२४ मध्ये विद्यापीठाचे रँकिंग ७११-७२० या दरम्यान हाेते. आयआयटी, मुंबईने जगात ११८व्या रँकसह भारतात पहिले स्थान पटकाविले आहे.
यंदा जगभरातील दीड हजार विद्यापीठे सहभागी झाले हाेते. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्येही मॅसुच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) अव्वल स्थान कायम राखले आहे. इम्पिरिअल कॉलेज लंडन दुसऱ्या स्थानी, तर ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड विद्यापीठ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. केम्ब्रिज विद्यापीठाने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे.
पाचशे रॅंकिंगमध्ये ११ भारतीय संस्था
आयआयटी, दिल्ली (१५०), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (२११) , आयआयटी, खरगपूर (२२२), आयआयटी, मद्रास (२२७), आयआयटी, कानपूर (२६३) , युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली (३२८), आयआयटी, रुरकी (३३५), आयआयटी, गुवाहटी (३४४), अण्णा युनिव्हर्सिटी, चेन्नई (३८३) आणि आयआयटी, इंदूर (४७७) पहिल्या पाचशे रॅंकिंगमध्ये क्रमांक पटकाविला आहे. तसेच दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाला ५८०वे स्थान मिळाले आहे.
पुण्यातील सिम्बॉयोसिस विद्यापीठाचाही समावेश
महाराष्ट्रातील आयआयटी, मुंबईपाठाेपाठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ६३१ ते ६४०, पुण्यातील सिम्बाॅयोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाला ६४१-६५० या श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ ७११ ते ७२० या दरम्यान रॅंकिंग मिळाले आहे.