- राहूल शिंदे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल बुधवारी संपुष्टात आला. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरूंच्या निवृत्तीनंतर प्र-कुलगुरू, चारही अधिष्ठाता यांचाही कार्यकाल संपतो. त्यामुळे सर्व शैक्षणिक कारभारी गेल्यानंतर आता विद्यापीठाचा मोठा पसारा सांभाळणार कोण? असा प्रश्न उपस्थित आहे. त्यावर प्रभारी कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. कारभारी काळे कोणते नियोजन करतात. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
राज्यपाल व राज्य शासन यांच्यातील कुलगुरू निवडीवरून सुरू असलेल्या वादामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदभार बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात आला. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. अंजली कुरणे, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांचाही कार्यभार आज संपुष्टात आला.
विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक निर्णय कुलगुरू, प्र-कुलगुरू व अधिष्ठाता घेतात. तर प्रशासकीय निर्णय डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेतले जातात. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रवेशासह परीक्षा व संशोधनाशी निगडित असणारे सर्व शैक्षणिक कामकाज आता ठप्प होणार आहे. कारभारी काळे यांच्याकडे प्रभारी पदभार असून त्यांच्याकडून पुणे विद्यापीठाला किती वेळ दिला जातो त्यावर विद्यापीठाच्या कामकाजाची गती ठरणार आहे. येत्या जून महिन्यात नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू करावी लागेल. तसेच जुलै महिन्यात अंतिम सत्राच्या परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा लागेल. ही कामे वेळेत झाली नाहीत तर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
नवीन व्यक्तींना संधी?
विद्यापीठाच्या चारही अधिष्ठात्यांकडे पुन्हा पदभार दिला जाणार, की नवीन व्यक्तींना संधी मिळणार याबाबत विद्यापीठ वर्तुळात चर्चा आहे. तसेच काहींनी राज्यपाल कार्यालयात जाऊन प्र-कुलगुरू व अधिष्ठाता यांच्या नियुक्तीबाबत काही नावांची शिफारस केली असल्याचे समजते. त्यामुळे नवे कुलगुरू शैक्षणिक कामकाजाची धुरा कोणाकडे सोपवतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
नवे कुलगुरू कोणाची निवड करणार?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पसारा पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात विस्तारलेला आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये तब्बल एक हजार महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. त्यात सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून या सर्व विद्यार्थ्यांची सुरळीतपणे परीक्षा घेण्याचे नेहमीच आव्हान असते. आतापर्यंतच्या बहुतांश सर्व कुलगुरूंनी ते लीलया पेलले आहे. मात्र, त्यासाठी त्यांना चांगल्या सहकाऱ्यांची साथ लाभली. नवे कुलगुरू कोणाची निवड करतात. यावर विद्यापीठाचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे.