पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेवून मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र पोर्टल सुरू केले असून मंगळवारपासून दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशालेअंतर्गत बी.ए., बी.कॉम.,एम.कॉम.,एम.ए. अभ्यासक्रमास प्रवेश दिले जाणार आहेत.
दूरशिक्षण अभ्यासक्रम केव्हा सुरू केला जाणार याबाबत विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा केली जात होती.अखेर मंगळवारी प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली. विद्यापीठाने या प्रवेश प्रक्रियेसाठी अहमदनगर,नाशिक व पुणे जिल्ह्यातील सुमारे 50 केंद्रांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सुरू केलेल्या केंद्रांमध्ये जावून माध्यमातून प्रवेश घेता येईल.तसेच अभ्यास साहित्य प्राप्त करता येईल.विद्यापीठाने निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्यासाठी 1 हजार 200 रुपये तर संलग्न केंद्राचे शुल्क म्हणून एक हजार रुपये द्यावे लागणार आहे.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील मुख्य पानावर ‘स्कूल ऑफ ओपन लर्निंग’ पोर्टल वर जावून विद्यार्थी अर्ज करू शकतील. विद्यापीठातर्फे संकेतस्थळावर सर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच, अभ्यासक्रमनिहाय प्रवेशाची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी केले आहे.