पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापक सहायक (टीचिंग असोसिएट) ही पदे कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांच्या मुदतीसाठी भरली जात आहेत; मात्र, या पदासाठी ३३ वर्षे वयाची अट घालण्यात आली आहे. यामुळे अनेक उमेदवार भरतीपूर्वीच वगळले गेले आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकाशी संबंधित पदासाठी देशभरात कुठेही वयाची मर्यादा नसताना विद्यापीठात अशी अट घालण्यात आल्याने सेट-नेट पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्राध्यापक सहायक म्हणून दोन पदे (एक खुला गटातून व एक राखीव गटातून) भरली जात आहेत. हिंदी, मास कम्युनिकेशन आदी विभागांमधील प्राध्यापक सहायक पदाची भरतीप्रक्रिया सध्या सुरू आहे. यापूर्वी अनेक विभागांनी प्राध्यापक सहायक पदाची भरती केली आहे. या पदासाठी इच्छुक असलेला उमेदवार संबंधित विषयातील द्विपदवीधर असावा, तो नेट-सेट उत्तीर्ण असावा, अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या पदांसाठी ३३ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावेत, अशी अटही घालण्यात आली आहे.उच्च शिक्षणात सेट-नेट, पीएच.डी. आदी पदव्या संपादन करेपर्यंत अनेकांची तिशी ओलांडली जाते. त्यामुळे प्राध्यापक, प्राध्यापक सहायक पदासाठी कुठल्याही विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये वयाची मर्यादा घातली जात नाही; मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने परस्पर सहायक प्राध्यापक पदासाठी वयांची अट घालण्यात आल्याने सेट-नेट पात्रताधारक उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.राज्यातील प्राध्यापक भरतीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर पात्रताधारक उमेदवारांकडून उपोषण, धरणे आंदोलन केले जात आहे. नोकरी भरती बंद असल्याने त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठात कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या जागा काढण्यात आल्या; मात्र, तिथेही वयाची अट टाकण्यात आल्याने अनेक उमेदवार भरती प्रक्रियेतून डावलले गेले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने तातडीने ही वयाची अट मागे घ्यावी, अशी मागणी सेट-नेट पात्रताधारकांनी केली आहे.परिनियम अस्तित्वात नसल्याचा गैरफायदानवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार प्राध्यापक सहायक पदाची भरती कशी करायची याबाबतचे परिनियम अद्याप तयार झालेले नाहीत. याचा गैरफायदा घेऊन विद्यापीठ प्रशासनाकडून बेकायदेशीरपणे प्राध्यापक सहायक पदासाठी वयाची अट टाकण्यात आल्याचा आरोप सेट-नेट पात्रताधारक उमेदवारांनी केला आहे.विभागाच्या गरजेनुसार निर्णयसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विभागांच्या गरजांनुसार प्राध्यापक सहायक पदासाठी वयाची अट घालण्यात आली आहे. त्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार ही कार्यवाही केली आहे.- डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रभारी कुलसचिवमर्जीतल्या उमेदवारांना घेण्याचा डावसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनातील अधिकारी, विभागप्रमुख यांना त्यांच्या मर्जीतील उमेदवारांची प्राध्यापक सहायक पदांवर भरती करण्यासाठी जाणीवपूर्वक वयाची अट टाकण्यात आली आहे. यामुळे पात्र असलेले उमेदवार या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.- सुरेश देवडे, समन्वय सेट-नेट पात्रताधारक संघर्ष समिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : प्राध्यापक सहायक पदासाठी वयाची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 2:22 AM