पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या नवीन कुलगुरुपदी निवड झाली आहे. त्यांनी जेएनयुच्या पहिला महिला कुलगुरू होण्याचा मान मिळवला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून प्राध्यापक पंडित यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
जेएनयुच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला कुलगुरू
प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित या पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. तसेच त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीही आहेत. देशातील या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या अध्यक्षपदी महिला कुलगुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शैक्षणिक प्रवास
प्राध्यापक शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, मद्रास आणि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमध्येही शिक्षण घेतले. तसेच त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात एमफिल आणि भारतीय संसद आणि परराष्ट्र धोरण या विषयावर पीएचडी केली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सोशल वर्कमध्ये डिप्लोमाही केला आहे. तसेच मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इतिहास आणि सामाजिक मानसशास्त्र आणि एमए राज्यशास्त्रात बी.ए.पूर्ण केले आहे.
जगदीश कुमार यांची जागा घेणार
जेएनयूचे प्रभारी कुलगुरू प्रोफेसर एम जगदेश कुमार कुलगुरूपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद डिसेंबर महिन्यापासून रिक्त आहे. कुमार यांनी जेएनयूमध्ये पाच वर्षं पूर्ण केली आहेत. नवे कुलगुरू येईपर्यंत कुमार यांच्याकडेच विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा भार असणार आहे.