पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्चशिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती विद्यापीठ निधीतून करण्यात येईल अशी माहिती शैक्षणिक प्रवेश विभागाच्या वतीने देण्यात आली. या निर्णयामुळे तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यास मदत हाेणार आहे.
राज्यातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये शासन निर्णय प्रसिद्ध केला हाेता. त्यानुसार विद्यापीठ अधिकार मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाचे तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यता प्राप्त शिक्षण संस्थांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेतलेल्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती विद्यापीठ निधीतून करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डाॅ. मुंजाजी रासवे यांनी मंगळवारी दि. २३ एप्रिल राेजी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, उच्च शिक्षण संस्थांचे प्राचार्य, संचालक आणि विभागप्रमुखांना या निर्णयाची अंमलबजावणीची सूचना केली आहे.
या निर्णयाचे स्वागत आहे; मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने खूप उशिराने हा निर्णय घेतला आहे. आम्ही जेव्हा शिक्षण घेत हाेताे तेव्हा मागणी करूनही काेणी मदत केली नाही. - चांदणी गाेरे, सामाजिक कार्यकर्त्या