पुणे : विद्यापीठाच्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा दि. १२ ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. पण ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये लॉगिन न होणे, इंग्रजी-मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका न मिळणे, सर्व्हर हँग होणे, आकृत्या व सूत्रे न दिसणे, टेस्ट सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळणे, दोन परीक्षा एकाच दिवशी येणे, विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा आदी तक्रारी याांचा समावेश आहेत. या तक्रारींबाबत २८ ऑक्टोबर रोजी परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये अडचणींमुळे परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा दि. ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान घेण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले.
विविध अडचणींमुळे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षा ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान केवळ ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. परीक्षेबाबत तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
या परीक्षा केवळ ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. विना अडथळा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देता येणार नाही. ऑफलाईन पध्दतीने परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन पुनर्परीक्षा देता येईल. त्यांच्याकडे संगणक, लॅपटॉप आदी सुविधा नसल्यास महाविद्यालयांनी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सुचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. ---------------तक्रारी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर पुनर्परीक्षेबाबतची माहिती दि. २ नोव्हेंबरपर्यंत पाठविली जाईल. तक्रार केलेल्या ज्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेसाठी विद्यापीठाचा ई-मेल मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.--------------