लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाची गुढी जगभरात उंच व्हावी, अशी प्रार्थना कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांंनी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने केली. ते व त्यांच्या पत्नी रोहिणी यांच्या हस्ते दत्तयाग करण्यात आला.
ट्रस्टच्या वतीने या वेळी ऑनलाईन पद्धतीने जगभरातील दत्तभक्तांची माहिती संकलित करण्याच्या उपक्रमाला सुरूवात केली. ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे, अॅड. शिवराज कदम जहागिरदार, अॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ यावेळी उपस्थित होते.
डॉ. करमाळकर म्हणाले, कोरोनाची महामारी भारतभर आहे, त्यापासून सर्वांना मुक्ती मिळू दे अशी प्रार्थना दत्तचरणी करीत आहे. ट्रस्टने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे. याद्वारे रक्तगटाची यादी देखील तयार होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल.
डॉ. पराग काळकर यांनी उपक्रमाची माहिती दिली. उमेश सकपाळ यांचा पहिला अर्ज भरला. यामुळे भाविकांची माहिती, रक्तगट आदी माहिती संकलित होणार आहे. भविष्यात कोठेही रक्ताची गरज भासल्यास किंवा अन्य मदत लागल्यास या माहितीचा उपयोग करुन घेता येईल, असे डॉ. काळकर यांनी सांगितले.