पुणे : दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निषेध केला. आज संध्याकाळी 7 वाजता विद्यापीठातील अनिकेत कॅन्टीन येथे एकत्र येत विद्यार्थ्यांनी जेएनयूच्या घटनेचा निषेध केला. तसेच, जेएनयूमधील विद्यार्थ्यांना ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्या समस्या पुणे विद्यापीठात सुद्धा असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
होस्टेल व इतर शैक्षणिक फी वाढीच्या विरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी काल संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चाला थांबवत पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी जखमी झाल्या. या घटनेचा निषेध करत पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आज एकत्र येत आंदोलन केले. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना रुक्सना पाटील शेख म्हणाली, 'जेएनयूमध्ये प्रशासनाद्वारे अतिशय अमानुषपणे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक भारतीय नागरिक एक जागरूक विद्यार्थीनी म्हणून मी या घटनेचा तीव्र निषेध करते. कारण आज वेगवेगळ्या माध्यमातून सामान्य विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार या शासनाने सुरू केला आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही.' याचबरोबर, सतीश पवार म्हणाला, 'जेएनयूच्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही आहोत. केवळ जेएनयूच नाहीतर देशातील कुठेही विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी शांत बसणार नाहीत. अन्यायाविरोधात नेहमीच लढत आलो आहोत. या पुढेही लढत राहू.'
याशिवाय, कमवा शिकाचे मानधन ताशी 60 रुपये करण्यात यावे, रविवारी कमवा शिकाला पगारी सुट्टी असावी, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीसाठी नवे जयकर व जुने जयकर 24 तास खुले करावे, मुलींच्या वसतिगृहाचे जाचक नियम शिथिल करण्यात यावेत, अशा विविध मागण्याही यावेळी विद्यार्थ्यांनी केल्या.