पुणे : पासष्ठाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात षड्ज या उपक्रमांतर्गत संगीतातील मान्यवरांवर आधारित लघुपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. त्याचबरोबर अंतरंग या कार्यक्रमातून महोत्सवात सादरीकरण करणा-या काही कलाकारांशी संवादही साधता येणार आहे. येत्या १३ ते १५ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते १२ या वेळेत सवाई गंधर्व स्मारकामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना यंदाच्या वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौैरवले जाणार आहे.बुधवारी १३ डिसेंबर रोजी षड्ज अंतर्गत भास्कर राव दिग्दर्शित म्युझिक आॅफ इंडिया, प्रमोद पाटी दिग्दर्शित रवी शंकर, एस. बी. नायमपल्ली दिग्दर्शित पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्यावरील लघुपट दाखवण्यात येणार आहेत. १४ डिसेंबर रोजी प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील माहितीपट, १५ रोजी रजत कपूर दिग्दर्शित तराना आणि पी. के. साहा दिग्दर्शित सारंगी - द लॉस्ट कॉर्ड हा लघुपट उपस्थितांना पाहता येणार आहे. अंतरंग या उपक्रमांतर्गत १३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. १४ डिसेंबर रोजी ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. श्रीनिवास जोशी हे यावेळी त्यांच्याशी संवाद साधतील. १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, महेश काळे आणि श्रीनिवास जोशी यांच्या स्वरसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हे तिघेही सर्जनाची आव्हाने या विषयावर आपले विचार मांडतील, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसिद्ध प्रकाश चित्रकार सतीश पाकणीकर हेही यावेळी उपस्थित होते.-----------पं. नाना मुळे यांना जोशी पुरस्कारभारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणा-या कलाकारांना दर वर्षी दिला जाणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. पं. नाना मुळे यांनी अनेक वर्षे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची संगत केली आहे.
सवाईत लघुपटांचा नजराणा, दिग्गजांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 8:26 PM