धनाजी कांबळे।पुणे : वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा अर्थ कळेल... वाचा म्हणजे श्रमिकाला त्याचा हक्क मिळेल... या विचाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून वस्तीवस्तीतल्या विहारांमध्ये ग्रंथालय सुरू करून त्यातून पुस्तकांचा जागर करण्याचा विडा पुण्यातील उच्चशिक्षित विवेकी तरुण-तरुणींनी उचलला आहे. ‘विहार तिथं ग्रंथालय’ असे त्यांच्या उपक्रमाचे नाव असून, शिक्षण, रोजगार सांभाळून ही मुले पुण्यातील वाड्या, वस्त्यांमध्ये हे अनोखे अभियान राबवीत आहेत. यासाठी त्यांना दानशूरांनी, पुस्तकप्रेमींनी पुस्तके देऊन हातभार लावण्याची गरज आहे.सोशल मीडियाच्या प्रभावाने पुस्तक वाचण्याचे प्रमाण कमी झाले. वाचनसंस्कृती टिकविण्याच्या कामासाठी मोबाईलच्या स्क्रीनवर बोटे फिरवणाºया तरुणाईला याच माध्यमातून साद घातली ती भाग्येशा कुरणे या तरुणीने. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा , संघर्ष करा’ या संदेशातील एक सूत्र घेऊन तिला हा उपक्रम सुचला. पुण्यातील दत्तवाडी येथील विहारातून सुरु झालेला हा उपक्रम सध्या ६ विहारांमध्ये सुरु असून, रत्नागिरीपर्यंत याचा सेतू बांधला गेला आहे. झोपडपट्टीतील मुलांच्या गुणवत्तेसाठी साऊ-रमाई शैक्षणिक प्रकल्पही राबवला जातो. त्यासाठी सूरज व गीता वाघमारे या नवदाम्पत्यानेही पुढाकार घेतला आहे. प्रतिमा पडघन, लहू कांबळे, मनीष पट्टे बहादूर, अनुपम बाम, सुधीर दिगोले, अक्षय ठाकरे, श्रद्धा देसाई, कुणाल शिरसाठे, किशोर कश्यप, वीरधवल सोनवणे यांनीही या उपक्रमात भाग्येशाला सहकार्य केले. दररोज चार-पाच तास वेळ देऊन हे सर्वजण शिक्षणाचा जागर करीत आहेत. आतापर्यंत हजारो पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप विहारांमधून करण्यात आले असून, हा प्रकल्प राज्यभर राबवण्याचा मानस असल्याचे भाग्येशा कुरणेने सांगितले. वैशाली गायकवाड, शिवाजी वाघमारे यांच्यासह अनेकांनी सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याने हे शक्य झाले, असेही भाग्येशाने सांगितले.
‘या’ मुलांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:41 AM