पुणे : पुरूषाला गर्भाशय असल्याचे निदान शहरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केल्याने एका ३३ वर्षीय तरुणाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. रुग्णालयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, हा प्रकार छपाईतील चुकीमुळे (प्रिंटींग मिस्टेक) झाला असल्याचा खुलासा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आला आहे.पाषाण येथील सागर गायकवाड (वय ३३) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. सागर हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत व्यवस्थापक आहेत. पोटात दुखत असल्याने ते ७ मे रोजी तपासणी करण्यासाठी कोथरुड येथील डॉक्टरकडे गेले होते. त्यांनी सागर यांना दीनानाथ रुग्णालयातून सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्या नुसार त्यांनी ही चाचणी केली. या चाचणीच्या अहवालात वयाच्या मानाने गर्भाशय व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे.पुरुषाला गर्भाशय असण्याची शक्यता वाटत नाही. हा प्रकार म्हणजे छपाईतील चूकच असेल. मेमधील ही घटना आहे. इतक्या कालावधीनंतर रुग्ण समोर येत आहे, हे विशेष.- धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे.मला प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. मित्रांशी देखील बोलणे टाकले होते. या प्रकाराविरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. - सागर गायकवाड, पिडीत रुग्ण
म्हणे, पुरुषाच्या शरीरात गर्भाशय! दीनानाथ रुग्णालयाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 12:48 AM