प्लॅॅटफॉर्म तिकीट १० तर पार्किंग २० रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणेकरांना आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना स्थानकांवर सोडायला जाणे महागात पडतय. कारण त्यांना त्यासाठी तीस रुपये मोजावे लागते. प्लॅॅटफॉर्म तिकीट १० तर पार्किंगसाठी २० रुपये द्यावे लागतात. त्यामुळे अनेक जण स्थानकाच्या बाहेरूनच ‘टाटा’, ‘बायबाय’ करून काढता पाय घेत आहे. याचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरदेखील होत आहे.
पुणे स्थानकावरून रोज सुमारे ६० ते ७० हजार प्रवासी प्रवास करतात. यातील ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना सोडण्यासाठी सोबत कोणीतरी येतो. त्यासाठी प्लॅॅटफॉर्म तिकीटसाठी दहा रुपये तर दुचाकी पार्किंगसाठी एका मिनिटापासून चार तासांसाठी वीस रुपये मोजावे लागते. जर चारचाकी असेल त्यालादेखील १ मिनिट ते २ तासांपर्यंत वीस रुपये दर आकारण्यात आला आहे. स्थानकावर प्रवाशांना सोडायला येणारी व्यक्ती फार तर अर्धा-पाऊण तास स्थानकात असते. तेवढ्यासाठी हा भुर्दंड सोसण्याची तयारी ठेवावी लागते.
बॉक्स १
प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई :
पुणे रेल्वे स्थानकावर रोज सरासरी ३ हजार प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होते. यातून आयआरएसडीसीला (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) रोज सुमारे ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र हे उत्पन्न घटत असल्याचे बोलले जाते. लॉकडाऊनच्या काळात पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट पन्नास रुपये करण्यात आले होते. आता पुन्हा जुलै महिन्यापासून प्लॅटफॉर्म तिकिट दर दहा रुपये करण्यात आले.
बॉक्स २
पार्किंग पडतंय महाग :
पुणे स्थानकावर पाहुण्याला निरोप देण्यासाठी आलेली व्यक्ती व्यक्ती फार तर तीस ते चाळीस मिनिटे स्थानकावर असते. मात्र त्याच्याकडून चार तासांपर्यंतचे भाडे घेण्यात येते. पहिल्या एका तासासाठी १० रुपये दर आकारणी गरजेची आहे. शहरातील महाविद्यालये, रुग्णालयांतही तासाकरीता १० रुपयांचे पार्किंग शुल्क आकारले जाते. मग स्थानकावर वीस रुपये का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
चौकट
“मी माझ्या आईवडिलांना सोडण्यासाठी येत असतो. मी १० ते १५ मिनिटे फलाटावर थांबतो. मात्र त्यासाठी गाडी पार्किंगसाठी चार तासांचे भाडे वसूल केले जाते. ते चुकीचेच आहे. अर्धा तास व एक तास असे स्लॉट गरजेचे आहेत.”
-दीपक क्षीरसागर, प्रवासी
चौकट
“पुणे स्थाकावरचे पार्किंगचे दर जास्त आहे. त्यामुळे मी अनेकदा स्थानकांच्या गेटवरूनच जातो. आत जात नाही. रेल्वे प्रशासनाने याचा विचार करून पार्किंगचे दर कमी केले पाहिजे.”
-सतीश माने, प्रवासी
चौकट
“पार्किंगचे दर हे नियमानुसारच आहे. असेच दर अन्य शहरातील स्थानकांवरही आहे. यात बदल होणार नाही.”
- सुनील कामठण, नोडल ऑफिसर, आयआरएसडीसी, पुणे स्थानक.