पुणे : सिंहगड पायथ्यापासून अपहरण केल्यानंतर शासकीय ठेकेदाराचा खून केल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार फरार आहे. आरोपींनी कोयता आणि सत्तूरने पोळेकर यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून ते खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये टाकले होते. यातील काही अवशेष शनिवारी (दि. १७) ग्रामीण पोलिसांच्या हाती लागले आहेत.विठ्ठल सखाराम पोळेकर (७० रा. पोळेकर वाडी, सिंहगड पायथा, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या खूनप्रकरणी रोहित किसन भामे (रा. डोणजे, ता. हवेली), शुभम पोपट सोनवणे (२४, रा. संगमनेर) आणि मिलिंद देविदास थोरात (२४, रा. बेलगाव, ता. कर्जत) अशी अटक आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे (रा. डोणजे) हा फरार आहे.पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा गुन्हा दाखल होताच पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. पोळेकर यांच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासताच त्यांच्या घरासमोरून एक चारचाकी सिंहगडाच्या दिशेने गेल्याचे आणि काही मिनिटांत पुन्हा माघारी डोणजे बाजूकडून पायगुडेवाडी मार्गे पानशेतकडे गेल्याचे आढळले. ही गाडी गावातील योगेश भामे याची असल्याचे कळले. योगेश घरी नव्हता, तसेच त्याचा फोनही बंद होता.यामुळे त्यानेच अपहरण केल्याची खात्री झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तांत्रिक तपासाद्वारे नाशिकपर्यंत गेले. तेथून आरोपी रेल्वेने जबलपूर येथे गेल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी जबलपूर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी शुभम आणि मिलिंदला ताब्यात घेतले. दरम्यान ग्रामीण पोलिसांचे एक पथक जबलपूरला गेले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेताच चौकशी केली असता, त्यांनी पोळेकर यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे धरणाच्या बॅक वॉटरमध्ये टाकल्याचे सांगितले. पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने घटनास्थळी जाऊन बोट आणि ड्रोनच्या सहाय्याने शोध घेऊन काही अवशेष हस्तगत केले.कारण अद्याप अस्पष्ट...आरोपींनी गुरुवारी (दि. १४) पोळेकर यांचे अपहण केल्यावर घरच्यांकडे पैशांची कोणतीच मागणी केली नाही. तसेच, त्यांचा खून ज्या प्रकारे अत्यंत निर्दयी पद्धतीने केला आहे, ते पाहता खंडणी हे कारण त्यामागे नसावे, अशी शक्यता पोलिसांना वाटत आहे. मुख्य आरोपी योगेश हा डोणजे गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे. त्याची पत्नी सरपंच आहे. अटक आरोपी रोहित हा त्याचा सख्खा भाऊ आहे. या दोन कुटुंबामध्ये यापूर्वी देखील काही वाद झाले होते.या प्रकरणातील आरोपी शुभम आणि मिलिंद डोणजे परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. योगेश भामे याने त्यांना पैशांचे आमिष दाखवून अपहरणाचा कट रचला. पोळेकर मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांना ‘मामा एक काम आहे’, असे म्हणत गाडीत बसवले. त्यांच्याबरोबर गाडीत काही वेळ वादावादी झाल्यावर धरणाच्या बॅक वॉटरला नेत त्यांचा खून करण्यात आला.
पुणे क्राईम : ‘मामा एक काम आहे’, म्हणत गाडीत बसवले अन् खून केला..!
By नितीश गोवंडे | Published: November 18, 2024 12:53 PM