इंदापूर: माझ्या शेतातील ठिबक सिंचनाचे कोणीतरी नुकसान केले आहे. गाय पण दूध देत नाही. यावर उपाय सांगा अशी भोंदूबाबाला विचारणा केली असता, तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे. असे सांगून एका त्याने वारंवार पैशाची मागणी करत तब्बल बारा लाख पैसे उकळले आहेत.
याप्रकरणी फिर्यादी दादासो ज्ञानदेव ताम्हाणे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे लेखी तक्रार करून मदत करण्याची विनंती केली होती. समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला आरोपी उत्तम लक्ष्मण भागवत यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. बारा लाखांची फसवणूक केल्याबाबत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी जबाबात नमूद केलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत भोंदूबाबा म्हणाला, तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे. दुसऱ्या दिवशी माझ्या अंगात देवीचा संचार होईल. मग मी तुमच्या सर्व बाबी सोप्या करून देईल. असे सांगण्यात आले. त्यानुसार फिर्यादी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेला. त्याठिकाणी त्याने अंगात अंतिद्रिय शक्ती असल्याचे सांगून ती माझ्या अंगात संचारली असल्याचा भास निर्माण केला. फिर्यादीच्या मनात करणीबाबत भीती निर्माण केली. त्यावर ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकीही दिली. करणी काढण्यासाठी तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील. कारण हे नुकसान भरून काढण्यासाठी माया दैव शक्ती मार्फत काम करावे लागते. असे भोंदूबाबाने सांगितले. त्याच क्षणी फिर्यादीने पैसे कशाला पाहिजेत. असा सवाल उपस्थित केला. त्यावरही भोंदूने तुम्हाला बेशुद्ध करून टाकेल. अशी धमकी दिली. तसेच पैसे दिले नाहीत तर घरातल्या व्यक्तीचा मृत्यू होईल. अशी भीती घातल्याने फिर्यादीने पैसे देण्यास सुरुवात केली. ठिबक सिंचनाचे नुकसान केलेल्या माणसाचा दोन दिवसात शोध लागेल. असे सांगून सुरुवातीला १० हजार रुपये घेतले. त्यानंतर वेळोवेळी भीतीपोटी भोंदूला पैसे दिले गेले. अशा प्रकारे १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. वालचंदनगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.