पुणे : शहरात अवघ्या दोन तासात झालेला ढगभूटी सारख्या पावसामुळे शहरात पावसाळी उपाययोजना कमी पडली. पण या पावसानंतर दोन तासात सर्व पाणी हटविण्यात आले असल्याचा दावा महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केला आहे. प्रत्यक्षात पहिल्याच पावसात पुणेकरांची दाणदाण झाल्याचे दिसून आले. अक्षरशः शहराच्या अनेक भागात कंबरेपर्यंत पाणी साचले होते. सर्वत्र अग्निशमन विभागाचे अधिकारी धडपड करताना दिसून आले. मात्र महापालिकेकडून कोणतीही मदत पोचली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. आता महापालिका भलताच दावा करत असल्याचे समोर आले आहे.
पुणे शहरात शनिवारी सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने सर्व जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये, दुकानात पाणी शिरले. शहरातील रस्त्यांवर जणू नदीच अवतरली आहे अशी परिस्थिती सर्वत्र होती. याबाबत पुणे महापालिका केवळ जोरदार पावसाचे कारण सांगून आपल्या चुकांकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. शहरात महापालिकेने नाला सफाई, पावसाळी गटारे आदी कामे केली असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. पण दोन तासात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला तर सर्व यंत्रणा फोल ठरते असे सांगितले गेले. तर पहिल्या पावसात सर्व कचरा, पालापाचोळा हा वाहून आल्याने पावसाळी गटारे, चेंबर तुंबतात हा दरवर्षी चा अनुभव आहे. पण पाऊस झाल्यावर दोन तासात सर्व साचलेले पाणी हटविण्यात यश आले असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. शनिवारी रात्री १ वाजेपर्यंत सर्व ठिकाणी साचलेले पाणी आम्ही वाट करून दिले असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.
पाणी साचण्याची कारणे
१. कमी वेळात जास्त पाऊस२. रस्त्यावरील पालापाचोळा व कचरा पाण्यासोबत वाहून आल्याने गटारे तुंबण्याचे प्रमाण३. सखल भागात पाण्याला जाण्यासाठी असलेली अपुरी यंत्रणा४. महापालिकेच्या पावसाळी गटाराचे अपुरे व्यवस्थापन५. मेट्रो व उड्डाणपूल यांच्या कामामुळे झालेली पाण्याची कोंडी.