राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा? अजित पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 02:51 PM2021-06-15T14:51:46+5:302021-06-15T15:05:52+5:30
अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट द्वारा खरेदी केलेल्या जमीन व्यवहारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे
पुणे : अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट द्वारा खरेदी केलेल्या जमीन व्यवहारावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. २ कोटींमध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला, त्यानंतर अवघ्या १० मिनिटात साडे अठरा कोटींचा करार कसा झाला ? असा सवाल करत अयोध्येतील माजी आमदार व समाजवादी पार्टीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असणाऱ्या तेज नारायण उर्फ पवन पांडे यांनी केला आहे. त्यात मंदिर जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केले. याचवेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर जमीन खरेदी घोटाळ्या संबंधी होत असलेल्या आरोपावर देखील भाष्य केले. पवार म्हणाले, जनतेने राम मंदिरासाठी हातभार लावला आहे. एवढा मोठा आरोप होत असेल तर वस्तुस्थिती जनतेला कळायला हवी.
अयोध्येत राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील निशाणा साधला आहे.तसेच सत्य समोर यायला हवं अशी मागणी केली आहे.
आम आदमी पक्षानेही लावला आरोप...
२ कोटींची खरेदी आणि साडे अठरा कोटींचा करार या दोन्ही व्यवहारांमध्ये राम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा हे साक्षीदार आहेत.याचप्रकारे दान केलेल्या पैशातून १६ कोटी हडपले गेले आहेत.हे मनी लॉंड्रिंगचं प्रकरण आहे. तात्काळ याप्रकरणाची सीबीआय किंवा ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं पाठवला केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अहवाल
अयोध्येमध्ये उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरासाठीच्या जागेच्या खरेदीवरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे. राम मंदिरासाठीच्या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांमुळे राम मंदिर ट्रस्ट मोठ्या अडचणीत सापडलं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं आता या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अहवालात ट्रस्टनं विरोधकांचं कटकारस्थान असल्याचं नमूद केलं आहे.
राम मंदिर ट्रस्टनं काय सांगितलं?
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनं अहवालात जमीन खरेदी संदर्भातील वस्तुस्थिती मांडली आहे. खरेदी करण्यात आलेली जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे जमिनीचे दर अधिक असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ज्या जमिनीची खरेदी झाली आहे ती १,४२३ रुपये प्रतिस्वेअर फूट दरानं खरेदी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या जमीन खरेदीसाठी आज नाही. तर गेल्या १० वर्षांपासून चर्चा सुरू होती. यात एकूण ९ लोकांचा समावेश आहे, असंही नमूद करण्यात आलं आहे.