पिंपरी : रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे द्यावे लागतील, लवकर करा इमर्जन्सी आहे, माझ्याकडे वेळ नाही, असे म्हणत रुग्णाच्या नातेवाईकांकडे फोन करून पैसे मागितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुग्णांकडे पैसे मागण्याचा हा प्रकार समोर आला आले. त्यामुळे खळबळ उडाली असून, रुग्णाच्या नातेवाईकांना गंडा घालण्याच्या या ‘स्कॅम’ची पाळेमुळे वायसीएम रुग्णालय प्रशासनात रुजली असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होत आहे.
वायसीएम रुग्णालयात महापालिका हद्दीतील तसेच जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. यात गरीब रुग्णांची मोठी संख्या आहे. रुग्णांना उपचार किंवा शस्त्रक्रिये दरम्यान थेट पैशांची मागणी केली जात नाही. तसेच फोनवरून त्यासाठी तगादा लावला जात नाही. रुग्णालयात कॅश काऊंटरवरच बिलाच्या रकमेचा भरणा होतो. असे असतानाही रुग्णांच्या नातेवाईकांना थेट फोन करून ऑनलाइन पैशांची मागणी होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
रुग्णांचा संपर्क क्रमांक कोणी दिला?
वायसीएम रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा किंवा त्याच्या नातेवाईकांचा फोन नंबर पैसे मागणाऱ्या व्यक्तीला कोणी दिला, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचारी यांच्यापैकी कोणीतरी या ‘स्कॅम’मध्ये सहभागी असल्यामुळेच रुग्णांची माहिती बाहेर जात असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.
...अशी केली पैशांची मागणी
पहिला काॅलकाॅलर : हॅलो डाॅक्टर आदित्य बोलताेय, काय करायचंय त्यांच्या ऑपरेशनचं?नातेवाईक महिला : घेतलंय ना ऑपरेशन करायला...काॅलर : तेच सांगतोय त्यांच्या पेमेंटचं कसं होणारनातेवाईक महिला : हो करतो आम्ही पेमेंट..काॅलर : कोण करणार आहे पेमेंट?नातेवाईक महिला : त्यासाठीच आलोय, थांबा पाच मिनिटं...काॅलर : अर्जंट आहे.
दुसरा काॅलकाॅलर : डाॅक्टर अग्रवाल बोलतोय, ओटीमध्ये आहे मी. मला अर्जंट आहे. त्यांचे ब्लिडिंग खूप होतेय. पटकन निर्णय घ्या.नातेवाईक : हो, साहेब करतो. पैसे मागवून घेतोय.काॅलर : करायचं की नाही करायचं ते मला पटकन सांगा. मला वेळ नाही तुमच्याशी इतकं बोलायला.
तिसरा काॅलकाॅलर : ऑपरेशन झालंय चांगल. मात्र, रक्त लागणार आहे. तसेच दोन इंजेक्शन लागतील. त्याची किंमत सात हजार ८०० रुपये होतेय. अर्जंट आहे. गुगल पे किंवा फोन पे आहे का?
नातेवाईक : ज्योतिबा फुले योजनेतून नाही होणार का?काॅलर : त्यातून होईल पण ते उद्या होईल. आज मला नाही पेमेंट कॅश भेटणार. तुम्हाला पेमेंट आता भरावे लागेल सात हजार ८०० रुपये. पटकन सांगायचं मला काय करायचे ते. पेमेंट अर्जंट आहे.नातेवाईक : गुगल पे, फोन पे नाही. कॅशमध्ये करतो.काॅलर : आजूबाजूला कोणाकडे गुगल पे, फोन पे आहे का?नातेवाईक : विचारतो.काॅलर : विचारा, फोन चालू राहू द्या.
चौथा काॅलकाॅलर : डाॅक्टर अग्रवाल बोलतोय.रुग्णालयातील कर्मचारी महिला : कोणत्या युनिटचे आहात तुम्ही...काॅलर : युनिट २, आर्थो.महिला : पूर्ण नाव सांगा सर तुमचेकाॅलर : डाॅ. विनायक श्रीकांत कुलकर्णी, अगरवाल सरांच्या अंडर आहे हा पेशंट.महिला : कसले पैसे सर?काॅलर : मेडिसीन आहे त्यांची.महिला : हे पैसे या लोकांनी कुठे द्यायचे?काॅलर : काउंटरला भरायचे आपल्या.महिला : कोणत्या काउंटरला भरायचे पैसे?काॅलर : आपल्या काउंटरला.महिला : कोणत्या काउंटरला, वायसीएमच्या का?काॅलर : अनुत्तरीत....
फसवणूक झालेल्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. रुग्णालयातील डाॅक्टर, अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास कारवाई करू.
- डाॅ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी