पुणे : अनेक नवमतदारांना, तसेच शहरी भागात नव्याने स्थलांतरित झालेल्या मतदारांना आपले मतदान केंद्र नेमके कोठे आहे, हे आता क्यूआर कोडद्वारे कळणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या मतदार चिठ्ठ्यांवर असे क्यूआर कोड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन मिळून मतदानाचा टक्का वाढेल, अशी आशा निवडणूक आयोगाला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील सर्व मतदारांची इत्थंभूत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या नागरिकाने मतदार म्हणून नावनोंदणी केल्यानंतर संबंधित विधानसभा मतदारसंघातील भाग यादीत त्याचे नाव समाविष्ट केले जाते. त्या भाग यादीनुसार जवळील मतदान केंद्रावर त्याला मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येते. मतदाराचे नाव, त्याचा पत्ता, एपिक क्रमांक (मतदार नोंदणी क्रमांक) वैयक्तिक तपशील, तसेच मोबाइल क्रमांक या सर्व बाबी नावनोंदणी केल्यानंतर यादी भागासह केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर एकत्रित केल्या जातात. त्यानंतर मतदार चिठ्ठ्या तयार करताना यादी भागानुसार त्या मतदान केंद्राचे लोकेशन क्यूआर कोडद्वारे तयार केले जाते.
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वितरण सुरू आहे. या चिठ्ठ्यांचे वितरण करताना क्यूआर कोडसह वैयक्तिक माहितीच्या चिठ्ठ्या मतदारांना देण्यात येत आहेत. त्यामुळे नवमतदार तसेच नव्याने स्थलांतरित झालेल्या मतदारांना आपले मतदान केंद्र नेमके कोठे आहे, हे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तातडीने कळणार आहे. मतदान केंद्र माहीत झाल्यामुळे मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्याचा थेट परिणाम मतदानाचा टक्का वाढण्यात होईल, अशी अपेक्षा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.
क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार इपिक क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाइल क्रमांक यापैकी एकाची माहिती भरून एका क्लिकवर आपल्या मतदान केंद्राची माहिती त्वरित उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
- कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी, बारामती लोकसभा मतदारसंघ