वानवडी : परिसरात शिवरकर रस्त्यावरील परमार पार्क येथे असणाऱ्या एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कँनर लावण्यात आल्याचा संशय पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांने व्यक्त केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परमार पार्क इमारती येथील एसबीआय बॅंकेच्या एटीएममध्ये एक व्यक्ती (पोलीसांकडून नाव मिळाले नाही) पैसे काढण्यासाठी गेली होती. पिन नंबर टाकताना तेथील नंबर पँड हलू लागल्याने या ठिकाणी स्कँनर असल्याचा संशय पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आला. या व्यक्तीने त्वरीत वानवडी बाजार पोलीस चौकीत जाऊन झालेल्या घटनेबद्दल सांगितले व एटीएम हे डुप्लिकेट किंवा स्कँनर बसवलेले असल्याची तक्रार देऊन त्याबद्दल योग्य ती माहिती घेऊन एटीएम विषयी तपासणी करण्याचा अर्ज वानवडी पोलीसांकडे दिला आहे.
रविवारी बँकेला सुट्टी असल्याने वानवडी बाजार पोलीसांनी तुर्तास तेथील एटीएम मध्ये पहाणी करुन स्कँनर सारखे वाटणारी वस्तू काढून आणली असून हि वस्तु स्कँनर आहे की एटीएमचाच एक भागा आहे याचा तपास सुरु असल्याचे पो. हवालदार दिवेकर व सहाय्यक पो. निरिक्षक भगवान कांबळे यांच्याकडून सांगण्यात आले.