माळेगाव : बारामती तालुक्याचा जिरायती भाग आताच दुष्काळाने होरपळू लागला आहे. चार-पाच वर्षांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. त्यामुळे येथील विहिरीतील पाणीपातळी कमी होत चालली आहे. तळी कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत तर ओढे-नाले तर केव्हाचे सुकले आहेत. पुढील काळात तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. जनावरांच्या पिण्यासाठी पाणी नाही. चाऱ्याचा प्रश्नही लवकरच ऐरणीवर आला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी जोर पकडू लागली आहे. महिलावर्गावर पाण्याची शोधाशोध करण्याची वेळ आल्याचे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. दुष्काळाचे हे विदारक दृश्य तालुक्यातील कऱ्हावागज, अंजनगाव, ढाकाळे, सोनकसवाडी, जळकेवाडी, सायंबाचीवाडी, मुढाळे, मुर्टी, लोणी, मासाळवाडी, तरडोली, पवारवाडी या आसपासच्या गावांमधून समोर येऊ लागले आहे. ही गावे दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष झेलत असतात. मग ते शेतीसाठी पाणी असो वा पिण्यासाठी. कशीबशी पिके काढायची व दिवस घालवायचे अशीच काहीशी परिस्थिती. या परिसरातील शेती प्रामुख्याने विहिरींवर आधारित आहे. जवळपास कोणताच मोठा पाण्याचा स्रोत नाही. त्यामुळे पडेल त्या पावसावरच शेती अवलंबून आहे. शेतात उभी असलेली ज्वारी, हरभरा इत्यादी पिके सूर्य वर आला की माना टाकत आहेत. कांद्याची तर पुरती नासाडी झाली आहे. कांदा गेल्याने ज्वारी तरी होईल या उद्देशाने शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली; परंतु आता बाटूक तरी हातात येइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनाने आमच्या व्यथा समजून घ्याव्यात अशी केविलवाणी प्रतिक्रिया जिरायती भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. वरुणराजाने आमच्यावर अवकृपा केली आहे. आता शासन तरी आम्हाला तारणार का, अशा शब्दांत परिसरातील शेतकरी आर्त हाक देत आहेत. (वार्ताहर)
नोव्हेंबरमध्येच टंचाईच्या झळा!
By admin | Published: November 22, 2015 3:31 AM