पणन कायद्यात केलेल्या जाचक सुधारणा आणि बाजार समितीच्या मर्यादित कार्यक्षेत्राविरोधात मंगळवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद होते. अडते, व्यापाऱ्यांसह माथाडी कामगारही एकदिवसीय संपात उतरले. परिणामी येथील मार्केटमध्ये इतर जिल्हे तसेच परराज्यातून येणारा फळे, भाजीपाला आलाच नाही. यामुळे उपनगरांमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला तुरळक भाजीपाला सगळीकडे चढ्या भावाने विकला जात होता.
गेल्या आठवड्यात बाजार समितीत कांद्यासह इतर भाजीपाल्याची आवक जास्त झाली होती. त्यावेळी बटाटा, भेंडी, काकडी, कारली, वांगी आदी भाज्यांच्या दरात घट झाली. बटाट्याचे भाव ५०० ते २ हजार रुपये झाले आहे, तर भेंडीचे भाव क्विंटलमागे ५०० ते १ हजार रुपयांनी घसरून १ ते ३ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मटारचे भाव हजार रुपयांनी घटले आहे.