पुणे : अजय देवगण प्रमुख भुमिकेत असलेल्या आगामी तानाजी चित्रपटातील एका दृश्यावर तानाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात तानाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधलेल्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचा संदर्भ इतिहासात कुठेही आढळला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चित्रपटातील हा भाग वगळण्यात यावा अशी मागणी प्रसाद मालुसरे यांनी केली.
प्रसाद मालुसरे म्हणाले, तानाजी या चित्रपटात दाखविण्यात येणारा इतिहास हा तानाजी मालुसरे यांचा इतिहास म्हणून यापुढील काळात ओळखला जाईल. तानाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यात तानाजी मालुसरे यांचे हात साखळदंडाने बांधलेले दाखविण्यात आले आहे. पण आतापर्यंतच्या तानाजी मालुसरे यांच्या इतिहासात अशाप्रकारचा प्रसंग कुठेही वाचण्यात अथवा ऐकण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रसंग या चित्रपटातुन वगळण्यात यावा अशी आमची मागणी आहे. तसेच चित्रपटात इतर कुठले आक्षेपार्ह दृश्य नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी चित्रपट प्रदर्शित हाेण्यापूर्वी तानाजी मालुसरे यांच्या वंशजांना दाखविण्यात यावा अशी मागणीही प्रसाद मालुसरे यांनी केली आहे.
दरम्यान 10 जानेवारी राेजी तानाजी हा चित्रपट प्रदर्शित हाेणार असून अजय देवगण, काजाेल, सेफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.