पुणे : उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सर्व रिक्त पदे ३१ जुलैअखेर भरणार, असे जाहीर केले होते. या घोषणेमुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते. आज ना उद्या कोणत्या तरी पदाची जाहिरात येईल आणि परीक्षा देता येईल, अशी आशा विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र एमपीएएससी २०२२ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस जाहीर करणार असल्याचे ट्वीट केले आहे. यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नाराजी पसरली असून, सरकारविरोधी संतापाची भावना आहे.
यापूर्वी शेवटची जाहिरात २०१९ मध्ये आली होती. त्यानंतर कोणतीही नवीन जाहिरात काढण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षे वाया गेले. नोव्हेंबरमध्ये वेळापत्रक जाहीर करून विद्यार्थ्यांचा अजून एका वर्षाचा कालावधी वाया जाणार आहे.
२०२० आणि २०२१ या वर्षात भरती झाली नाही. स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर तरी सरकारला जाग येईल, असे वाटले होते. मात्र, केवळ आश्वासने देऊन या सरकारने विद्यार्थ्यांना वेड्यात काढले आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
राज्य सरकारने १५ हजार जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. त्याच काय झाले? ३० सप्टेंबरपर्यंत सगळ्या विभागांचे रिक्त पदांचे मागणी पत्र पाठवून जाहिरात काढणार होते. यावरून एमपीएससी आणि राज्य सरकार यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे, असा आरोप होत आहे.
स्पर्धा परीक्षेच्या विळख्यात २१ ते ३० या वयोगटातील तरुण पिढी अडकलेली आहे. सामाजिक अडचण, आर्थिक नुकसान, नैराश्य, मानसिक तणाव आदी गोष्टींचा तरुण सामना करीत आहेत. तसेच कोरोनामुळे काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. नोव्हेंबरअखेरीस जाहीर झाले, तर परीक्षा थेट सहा महिन्यांनंतर होतील. यावरून सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येत असल्याच्या आरोप स्पर्धा परीक्षेतून होत आहे.