पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशाचे वेळापत्रक येत्या आठवड्याभरात प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यातच शैक्षणिक वर्ष २0१७-१८च्या प्रवेश प्रक्रियेत काही बदल केले जात आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात सुरू होणारी प्रवेशप्रक्रिया जानेवारीत सुरू होणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.राज्याच्या शिक्षण विभागातर्फे यंदाही आरटीईच्या जागांसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्यातील शाळांची संख्या वाढल्याने आरटीई प्रवेशाची क्षमताही वाढणार आहे. परिणामी यंदा गेल्या वर्षापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्यातील बहुतांश सर्वच इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यातच पूर्ण केली. परिणामी सीबीएसई बोर्डाच्या शाळा लवकर सुरू होणार आहेत. त्यामुळे आरटीईच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. गेल्या काही वर्षांतील आरटीई प्रवेश प्रक्रियेचा विचार करता आरटीईच्या काही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मे किंवा जून महिना उजाडणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशप्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक आठवड्यात
By admin | Published: January 03, 2017 6:36 AM