मार्गासनी : मालवली (ता. वेल्हे) येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या दुसऱ्या देयकासाठी ग्रामपंचायत खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम गायब झाली आहे. पाणी कमिटीने ठेकेदाराला दिलेला धनादेश खात्यात रक्कम नसल्याने परत (बाऊन्स) आला आहे. या प्रकरणी गावचे सरपंच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगेश कोडीतकर व ग्रामसेवक जे. डी. जाधव यांच्याकडून गैरव्यवहार झाल्याची शक्यता असून, चौकशी करण्याची मागणी पाणी योजनेच्या ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.सरपंच मंगेश कोडीतकर व ग्रामसेवक जे. डी. जाधव यांनी ग्रामपंचायत खात्यावर पाणी योजनेसाठी जमा झालेली रक्कम पाणीपुरवठा समितीच्या खात्यावर वर्ग करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. शिवाय, ग्रामपंचायतीच्या खात्यावर ती रक्कम शिल्लक असणे गरजेचे असताना तेथेदेखील ती रक्कम दिसत नाही. हे खाते चालवणारे कोडीतकर व जाधव यांनी या खर्च झालेल्या रकमेची सविस्तर माहिती देणे गरजेचे आहे. ती दिली जात नाही याचा अर्थ रकमेचा अपहार झाल्याची शक्यता असून त्याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे ठेकेदार नलावडे यांनी सांगितले.याबाबत सरपंच मंगेश कोडीतकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ग्रामपंचायत मालवलीच्या खात्यावर जमा झालेले पैसे नजरचुकीने इतर विकासकामांसाठी खर्च झाले असून येत्या आठवडाभरात संबंधित ठेकादाराचे देयक ग्रामपंचायतीकडून अदा केले जाईल. (वार्ताहर)
योजनेचे पैसे खात्यावरून गायब
By admin | Published: September 09, 2016 1:43 AM