नितीन गायकवाड
पुणे : स्किझोफ्रेनियाग्रस्तांनाही आता कोणाचाही आधारविना जगण्याचा आत्मविश्वास मिळत आहे. त्यांना मानसिक आजार असल्याने अनेकजण नोकरी देत नाहीत. त्यामुळे ते नैराश्यात जातात. पण आता ‘परिवर्तन’ संस्थेमुळे त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभा राहता येत आहे.
मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीच्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी ‘परिवर्तन’ या सेवाभावी संस्थेची स्थापना तीन दशकांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. शैला दाभोलकर यांनी केली. संस्थेद्वारे तीव्र मानसिक आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तींना आधार देऊन व्यवसायाभिमुख कामाचे प्रशिक्षणही दिले जाते. संस्थेने आज अखेर शंभराहून अधिक रुग्णांना बरे करून नोकरी मिळवून दिली आहे आणि त्यांचे पुनर्वसन केले आहे.
तीव्र मानसिक आजारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणा-या रुग्णांसाठी संस्थेचे कोथरूड येथे ‘मनोबल कौशल्य’ केंद्र दररोज सुरू आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हा एक गंभीर मानसिक आजार असून, जगभरात २१ दशलक्षाहून अधिक लोकांना याचा त्रास होतोय. या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्याबद्दलची सर्वसामान्यांमध्ये जागरूकता आणि त्याबाबतच्या अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
-----------
समाजात अजूनही मानसिक आजारांविषयी खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. परिवर्तनमार्फत मानसिक आरोग्य सुविधा या माफक दरात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविल्या जातात. लॉकडाऊनमध्येही संस्थेचे काम थांबलेले नाही. संस्थेने ‘मानसरंग’ व ‘मनोबल’ हे उपक्रम बंद न ठेवता आॅनलाइनद्वारे त्यांची महाराष्ट्रभर व्याप्ती वाढविली आहे. समाजातील दुर्लक्षितांना संस्थेमार्फत पुणे, सातारा व आसाममध्ये सेवा दिल्या जातात.
-----------
कलागुणांना वाव दिल्याने वाढतोय आत्मविश्वास...
मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करून त्याविषयी प्रबोधन करणे या उद्देशाने संस्थेमार्फत ‘मानसरंग’ नावाचा उपक्रम चालवला जातो. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे आणि राजू इनामदार यांच्या संकल्पनेतून मानसरंगची निर्मिती झाली आहे. तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन नाटक, गाणे, कविता, चित्रकला अशा कला माध्यमांतून तीव्र आजारी व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना बळ देण्याचे काम यात केले जाते. दर शुक्रवारी तीव्र मानसिक आजाराशी संघर्ष करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे पालक एकत्र येतात व आठवड्याभराचा आत्मविश्वास घेऊन जातात.
-----------