पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २० फेब्रुवारी २०२२ रोजी शिष्यवृत्तीपरीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यास विलंब झाला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाले नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली. परंतु,आता कोरोना विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती वर्ग सुद्धा ऑफलाइन पद्धतीने सुरू होऊ शकतात.
परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना २०० रुपये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १२५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.